View: 3

स्वातंत्र्याचा खरा अर्थ: अल्गोरिदमची गुलामी आणि आपले कर्तव्य!

स्वातंत्र्यदिनी 'आपण खरंच स्वतंत्र आहोत का?' हा गुळगुळीत प्रश्न विचारण्यापेक्षा नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि हरवलेले नागरिकशास्त्र यावर सडेतोड विचारमंथन.
Satyavachan

१५ ऑगस्ट उजाडला की दरवर्षी एक ठरलेला कोलाहल सुरू होतो. “आपण आज खरंच स्वतंत्र आहोत का?” हा एक गुळगुळीत आणि अर्थहीन प्रश्न विचारून बौद्धिक कंड शमवण्याची जणू एक प्रथाच पडली आहे. महासत्तांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळवणे हा एक अफाट आणि अभूतपूर्व इतिहास होता. पण आजच्या घडीला तोच तोच रटाळ प्रश्न विचारून आपण आपल्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणे मुळात चुकीचे आणि पोकळ आहे.

आज आपण भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि गुन्हेगारीच्या ज्या दलदलीत रुतलो आहोत, त्याचे खापर व्यवस्थेवर फोडणे खूप सोपे आहे. पण या सगळ्याचे मूळ कारण कुठे असेल, तर ते आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि मानसिकतेत आहे. आपण शालेय जीवनात ‘नागरिकशास्त्र’ (Civics) या विषयाला नेहमीच ‘ऑप्शनल’ (पर्यायी) ठेवले आणि दुर्दैवाने खऱ्या आयुष्यातही नागरिक म्हणून असलेल्या आपल्या कर्तव्यांना तीच दुय्यम वागणूक दिली.

हक्कांसाठी गळा काढणारी आणि मुंडी कापलेल्या कोंबड्यांसारखी थैमान घालणारी झुंड आपण रोज पाहतो. पण या झुंडीला हे माहीत नाही की, जर देशातील प्रत्येक नागरिकाने आपले ‘कर्तव्य’ निष्ठेने आणि इमानदारीने पाळण्याचे प्रगल्भ भान ठेवले, तर हक्कांसाठी कोणापुढे झोळी पसरण्याची किंवा आक्रोश करण्याची वेळच येणार नाही. आपण आपली जबाबदारी चोख पार पाडली, तर जे आपले हक्क आहेत, ते अधिकाराने आपल्या पायाशी चालत येतीलच.

त्यामुळे आता कुठे थांबायचं आणि काय बदलायचं, हे ज्याचे त्याने ठरवण्याची वेळ आली आहे. आजचा खरा लढा कुठल्याही बाह्य शक्तीशी नाही, तर सोशल मीडियाच्या ‘अल्गोरिदम’च्या तालावर नाचणाऱ्या आणि दुसऱ्यांचे विचार उसणे घेऊन जगणाऱ्या (Impersonated) आपल्याच गुलाम मानसिकतेशी आहे. या कृत्रिम आणि दिशाहीन झुंडीतून स्वतःला बाहेर काढा.

आपण जे काही करतोय, त्यात स्वतःशी आणि आपल्या कामाशी आपण अत्यंत प्रामाणिक राहिलो, तरच खऱ्या अर्थाने या देशाला आपण एका अढळ आणि प्रगल्भ स्वातंत्र्याकडे घेऊन जाऊ!

स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

Satyajeet N

"Observations of a passionately curious mind"

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *